!! सहर्ष स्वागत !! महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे !! Maharashtra Rajya Sahakari Sangh M. is celebrating Centenary Year From 13th July 2017 To 13 July 2018.

सहकार क्षेत्रातील 100 वर्षे पूर्ण करणारी राज्यस्तरीय शिखर संस्था " महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म.पुणे "

Click Here ==>> इतिहास व वाटचाल

  1. स्वातंत्र्य पूर्व काळात भारतातील शेतक-यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. सावकाराच्या चक्रव्यूहात तो इतका गुरफटला होता की, त्यातून सुटणे मुश्कील झाले होते. त्यातूनही तो सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न ही करीत होता पण त़ो त्यात आणखी गुरफटत जात होता. त्यामुळे असंतोष खदखदत होता.१८७५ साली पुणे, अहमदनगर या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सावकाराविरूध्द बंड केली. लोकमान्य टिळकांनी शेतकरी वर्गाला *राष्ट्राचा आत्मा* संबोधून त्या वर्गाची सुधारणा होण्याची निकड वेळोवेळी केसरी मध्ये लेख लिहून जनतेच्या नजरेस आणली.या सर्वांचा परिणाम म्हणून शासनाने 1904 साली भारताचा को आँप क्रेडिट सोसायट्यांचा पहिला कायदा पास केला. आणि 1905 साली धारवाड जिल्ह्यात कंगिनहल येथे पहिली शेतकी पतपेढी सुरु झाली.
  2. हळूहळू अन्य भागात ही अशा प्रकारच्या लहान लहान पतपेढ्या स्थापन होवू लागल्या. लोकांनी स्वेच्छेने यात सहभाग घेतला. सहकारातच आपले कल्याण आहे, त्यामुळे सहकाराचा प्रसार, प्रचार होणे गरजेचे आहे .असा विचार प्रवाह पुढे येवू लागला. सप्टेंबर1917 मध्ये पुण्यात एक सहकार परिषद बोलावली गेली. या परिषदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींसह देशाच्या काना कोपऱ्यातून सहकारातील कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात सहकाराशिवाय तरणोपाय नाही असा सूर या परिषदेत घुमू लागला.प्रथम लोकांना सहकार काय आहे याची कल्पना द्यावी लागेल आणि प्रशिक्षण द्यावे लागेल याबाबतीत महात्मा गांधी यांनी जोर धरला. आणि त्यासाठी राज्यात एक राज्यस्तरीय सहकारी शिक्षण, प्रशिक्षण देणारी यंत्रणा असावी असे मत मांडले.आणि तेथेच ख-याअर्थाने महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज हीच संस्था 100 वर्षे पूर्ण करीत आहे. या परिषदे नंतर या संस्थेच्या रितसर उभारणीस सुरूवात झाली. ना.म.जोशी, गोपाळ देवधर, सर विठ्ठलदास ठाकरसी, एस एस तालमाकी, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठ भाई मेहता अशा अनेक धुरीणींचे सहकार्य लाभले.२ जानेवारी 1918 व 28 जानेवारी 1918 रोजी याबाबतीत दोन महत्त्वाच्या सभा घेण्यात आल्या. संस्थेचे पोटनियम तयार करण्यात आले. नियोजित बाँम्बे सेंट्रल को आँपरेटिव्ह इन्स्टिट्यूट असे नाव देण्यात आले. आणि 13 जुलै ,1918 रोजी सन 1912 च्या सहकारी कायद्याप्रमाणे संस्थेची रितसर नोंदणी झाली. संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून राज्यपाल लाँर्ड विलिंग्डन तर उपाध्यक्ष म्हणून लल्लुभाई सामळदास यांची निवड करण्यात आली. तर मानदसचिव पदी रावबहादूर एस एस तालमाकी यांची निवड करण्यात आली.
  3. इन्स्टिट्यूट चे कार्य वाढावे यासाठी मुंबई शहरात 24 आँक्टोबर १९२०, पुणे येथे 4 नोव्हेंबर १९२०, कर्नाटक धारवाड येथे 7 नोव्हेंबर 1920 आणि गुजराथ भडोच येथे 23 नोव्हेंबर 1920 यादिवशी शाखा स्थापन करण्यात आल्या.२२ आँक्टोबर 1921 रोजी ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, अलिबाग येथे तर 5 मार्च 1922 रोजी सिंध प्रांतासाठी शाखा सुरू करण्यात आल्या.३१ मार्च 1944 अखेर राज्याच्या बहुतांशी जिल्ह्यात शाखा स्थापन करण्यात आल्या.१३ जून 1926 रोजी विशेष साधारण सभेत नवीन घटना मंजूर करण्यात आली. सभेत संघाचे अध्यक्ष हे लोकनियुक्त असावे असे ठरले त्यानुसार संघाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून गोपाळ देवधर यांची निवड करण्यात आली. आणि इन्स्टिट्यूट चे *दि बाँम्बे प्रोव्हिन्शियल को आँपरेटिव्ह इन्स्टिट्यूट* असे नामकरण करण्यात आले.
  4. 31 मार्च 1926 अखेर जिल्हा शाखा स्थापन करण्यात आल्या. आणि अशारीतीने संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जिल्हा सहकारी मंडळे स्थापन करण्यात आली.४ आँक्टोबर1949 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत पोटनियम दुरूस्ती करण्यात आली. संस्थेच्या नावात पुन्हा बदल करून तिचे नाव *मुंबई प्रोव्हिन्शियल कोआँपरेटिव्ह इन्स्टिट्यूट* असे ठेवण्यात आले. आणि याच सभेत उपाध्यक्ष व मानदसचिव हे पद निर्माण केले गेले. उपाध्यक्ष पदी प्रा. द.गो.कर्वे यांची निवड करण्यात आली.
  5. 1 नोव्हेंबर 1952 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पोटनियम दुरूस्ती करून विभागीय सहकारी मंडळे,जिल्हा सहकारी बोर्ड अशी फेडरल रचना तयार करण्यात आली.१० फेब्रुवारी 1952 रोजी अहमदाबाद येथे गुजरात विभागीय सहकारी बोर्ड,२३ मार्च 1952 रोजी पुणे येथे महाराष्ट्र विभागीय सहकारी बोर्ड तर 6 एप्रिल 1952 रोजी धारवाड येथे कर्नाटक विभागीय सहकारी बोर्ड यांची स्थापना करण्यात आली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले.१२ एप्रिल 1961 ,पासून संघाचे नाव *महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह युनियन* असे करण्यात आले. आणि जुलै 1969 पासून ही संस्था *महाराष्ट्र राज्य सहकारी स़घ म पुणे* या नावाने ओळखली जावू लागली.
  6. 25 मार्च 1954 रोजी देशाच्या सहकार चळवळीला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने हा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु उपस्थित होते.
  7. संघाने आज पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात 33 राज्य सहकारी परिषदे घेतली. दोन महाविद्यालये,पाच विभागीय सहकारी मंडळे,१३ सहकार प्रशिक्षण केंद्रे आणि 33 जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शहराबरोबरच ग्रामीण भागातील अती दुर्गम परिसरात पोहोचून सहकारी शिक्षण ,प्रशिक्षण दिली आणि देत आहे. एवढी सक्षम यंत्रणा देशात कोणत्याही संस्थेकडे नाही हे अभिमानाने सांगावेसे वाटते. मुक्त आर्थिक धोरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या युगात टिकून राहण्यासाठी संगणकीय शिक्षण आणि माहीती तंत्रज्ञानाची आवश्यकता ओळखून संघाने आपली वेबसाईट सन 2001 मध्ये सुरु केली. देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे पोटनियम तयार करण्यासाठी संघाची भूमिका फार मोठी होती.
  8. सहकारी संस्था, सहकारी खाते,सेवक यांच्या साठी वेळोवेळी प्रशिक्षणे दिली.सभासद शिक्षणाद्वारे सभासदांना जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य संघाने केले आहे व आजही करीत आहे. सहकाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फिल्म शो,परिषद, परिसंवाद, प्रदर्शने यांच्या माध्यमातून तळागाळातील सहकारी कार्यकर्ते व सभासदांना माहिती दिली. सहकार चळवळ आणि शासन यांच्या मध्ये *दुवा* म्हणून संघाने महत्वाची भूमिका बजावली आहे. नवीन सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी संघाने सातत्याने प्रयत्न केला आहे. सहकार चळवळीचा अभ्यास आणि संशोधन करून चळवळीस मार्गदर्शन केले आहे. ही संस्था *सहकार चळवळीचा प्रवक्ता* म्हणून काम करीत आहे. शालेय जीवनापासूनच सहकाराची आवड निर्माण होण्यासाठी शाळांमधून सहकाराचे विविध कार्यक्रम आयोजित केले. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकाराची माहिती व्हावी म्हणून दरवर्षी राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते.दरवर्षी डॉ धनंजयराव गाडगीळ व्याख्यान माला आयोजित करून गाडगीळ यांचे विचार सर्वदूर पोहोवण्याचे कार्य संघ करीत आहे. दरवर्षी14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत अखिल भारतीय सहकार सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात संघाचे वतीने साजरा केला जातो. सहकारी कायद्यात बदल होत असताना त्यात संघाचा अभिप्राय वेळोवेळी घेतला गेला.
  9. सहकाराची प्रसिद्धी होण्यासाठी सहकार या विषयी लेख,बातम्या, शासन परिपत्रक ,सहकारी कार्यकर्त्यांची ओळख अशा विविध बाबी लोकांपर्यंत जाण्यासाठी संघाचे *सहकारी महाराष्ट्र* हे मराठी मासिक व *दि को आँपरेटिव्ह* हे इंग्रजी त्रैमासिक सुरू केले असून या नियतकालिकांचे देशात च नव्हे तर परदेशात ही सभासद आहेत. या दोन्ही नियतकालिकांचा मला *कार्यकारी संपादक* म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझ्या कारकीर्दीत या दोन्ही नियतकालीकांना नवी दिल्ली च्या राष्ट्रीय सहकारी संघा तर्फे देशातील उत्कृष्ट मासिक म्हणून सन्मान चिन्ह देवून दिल्ली येथे गौरविण्यात आले. हे अभिमानाने सांगावेसे वाटते.
  10. शासनाच्या कोणत्याही आर्थिक कुबड्या न घेता संघाने आपला 100 वर्षाचा प्रवास सुरु ठेवला आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी कार्यकर्ते व सहकारी संस्था यांचा विश्वास संपादन केला आहे. या प्रवासात खूप अडचणी आल्या परंतु सक्षम यंत्रणा आणि प्रदीर्घ अनुभव या जोरावर संघ डगमगला नाही. देशातील इतर राज्य सहकारी संघास शासनाचे अनुदान मिळते मात्र या शंभर वर्षाच्या शिखर संस्थेस मात्र शासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. शंभर वर्षात पदार्पण करताना या संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, सेवक आणि सभासद यांनी सिंहावलोकन करणे आवश्यक आहे.१०० वर्षात काय कमावले आणि काय गमावले?याचा हिशोब मांडला पाहिजे. समोर अनेक स्पर्धक ठामपणे उभे असताना आपल्या संस्थेला टिकवायचे असेल तर संस्थेचा डोलारा मजबूत करणे आवश्यक आहे, काम करणा-या सेवकांना शाश्वती देवून त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न होता त्या चुकांची योग्य प्रकारे दुरूस्ती करून पुनश्च ताठमानेने हा संघ राज्यातील सहकार चळवळीला ख-या अर्थाने खंबीरपणे नेतृत्व करण्यासाठी सज्ज करावे.....१०० वर्षे म्हणजे म्हातारपण नसुन तो प्रचंड अनुभव आहे आणि याच जोरावर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आपली घौडदौड आधिक गतीने करत आहे.